दिलेला शब्द असाच पाळत राहणार! आदित्य ठाकरे यांचे आश्वासन
पंचवीस वर्षे नेते, मंत्री येत-जात होते. संघर्ष समिती चिकाटीने निवेदन देत होती. तब्बल 25 वर्षे हाच संघर्ष चालू होता, तो खंडित झाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक निवेदन स्वीकारले तेव्हा! युवासेनाप्रमुखांनी पुढाकार घेतल्यामुळे 25 वर्षे रखडलेला सोलापूर जिह्यातील सारोळे येथील आष्टी टप्पा-2 प्रकल्प मार्गी लागला.
मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱया टप्प्याचे तसेच पोखरापूर येथील तलावात सोडण्यात येणाऱया पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, तेव्हा त्यांनी या कामात पुढाकार घेणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि शिवजलक्रांती मोहीम हाती घेतलेले जलसंधारण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.
नेते येतात, निवेदन घेतात, फोटो काढून पुढे निघून जातात. मलाही फेब्रुवारीत संघर्ष समितीने निवेदन दिले. परंतु, हे असेच किती वर्षे चालणार? म्हणून तत्काळ शिवतारे बापूंना ते निवेदन पाठवले आणि चार दिवसांत प्रकल्पाचे डिझाईन, टेंडर तयार होऊन दोन हजार एकर शेतीला पाणी देणारा प्रकल्प मार्गी लागला. मधल्या काळात आचारसंहिता असल्यामुळे आता हे भूमिपूजन होतेय. आम्ही दिलेला शब्द असाच पाळत राहणार, यापुढेही पाळणार, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जनआशीर्वाद दौरा सुरू करतोय, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात ज्या शेतकऱयांना काही त्रास असेल, तर त्यांनी वेडावाकडा विचार न करता शिवसेनेचा विचार मनात आणावा. शिवसेना मदतीसाठी धावून येईल.
यावेळी शिवसेना उपनेते, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख, जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक जिल्हा परिषद सदस्या, शैला गोडसे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment